आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
व्हॉट्सअॅप फोनमध्ये नाही असा माणूस आज शोधूनसुद्धा सापडणार नाही. भले व्हॉट्सअॅप लाँच झाल्यानंतर टेलिग्राम, हाईक, मेसेंजर असे अनेक मेसेजिंग अॅप आले, आणि काही गेलेसुद्धा. पण व्हॉट्सअॅपची लोकप्रियता ओसरली नाही उलट ती उत्तरोत्तर वाढत गेली आणि २०१७ मध्ये व्हॉट्सअॅप फेसबुकने विकत घेतले.
फेसबुकच्या मालकीमुळे आता हे अॅप त्याच्या मूळ स्वरूपात न राहता मेसेंजरमध्ये विलीन होणार की काय अशी अफवा होती मात्र फेसबुकचा सीइओ मार्क झुकेरबर्ग याने व्हॉट्सअॅपच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासन दिले आणि त्याच्या रुपात थोडेफार बदल करून आजही व्हॉट्सअॅप त्याच्या मूळ हिरव्या लोगोसह चालू आहे.
अर्थात जरी हे एक अत्यंत लोकप्रिय सोशल अॅप असले तरी याचा वापर पूर्णपणे सुरक्षित आहे का? याचं उत्तर शोधायला गेल्यास हाती निराशा येईल. होय तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून तुम्ही करत असलेले संभाषण पूर्णपणे सुरक्षित नाही.
अनेक वेळा आपण पाठविलेल्या मेसेजेसचे स्क्रीनशॉट काढून आपल्या हितशत्रूंकडून पुढे फिरवले जातात. हे प्रकार २४ तास व्हिजिबल असलेले व्हॉट्सअॅप स्टोरी फिचरच्या बाबतीत जास्त घडतात.
या फिचरची एक डोकेदुखी म्हणजे आपल्या फोनमध्ये जे व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह केलेले असतात त्या सगळ्यांना आपली व्हॉट्सअॅप स्टोरी दिसू शकते.
सहजपणे इथे आपली प्रायव्हसी धोक्यात येते. यावर नियंत्रण म्हणून आपल्याला ज्या संपर्क क्रमांकाच्या सोबत आपली स्टोरी शेअर करायची नसेल, अशा लोकांचे नंबर आपण सेटिंग्समध्ये जाऊन सिलेक्ट करून त्यांना आपली स्टोरी दिसणार नाही इतपत व्यवस्था करू शकतो मात्र कुठलेही नवीन नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी सेटिंगमध्ये जाऊन हा बदल करणे अपरिहार्य आहे.
फेसबुकने व्हॉट्सअॅप घेतल्यावर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता तो डेटा सिक्युरिटीचा. कारण सध्याच्या युगात फेसबुकवर मार्केटिंग मोनोपॉलीचा मोठा आरोप लावला जातो.
स्वत:च्या युझर्सचा डेटा गोळा करून तो स्पर्धक कंपन्यांना त्यांच्या मालाचा खप वाढवण्यासाठी विकणे यात फेसबुक अग्रेसर राहिला आहे.
कित्येक वेळा आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट, अथवा गुगलवर काहीही सर्च केलं किंवा आपल्या मोबाईलचा जीपीएस चालू ठेवून कुठल्या मार्केटमध्ये काही खरेदी करावयास गेलो आणि त्यानंतर कधी फेसबुक चालू केल तर आपण लोकल आणि ऑनलाईन मार्केटमध्ये जी वस्तू शोधात असू किंवा घेत असू त्या वस्तू, सेवा अचानक फीडमध्ये दिसू लागतात.
फेसबुकच्या विरुद्ध अमेरिकेत जो सिव्हील सूट फाईल करण्यात आला त्यात जवळजवळ ७००० पानी डॉक्यूमेंट कोर्टात सदर करण्यात आले त्यात मार्क झुकेरबर्ग आणि त्याची टीम आंतरराष्ट्रीय बाजारातील कंपन्यांना आपल्या युझर्सचा डेटा विकते असा निष्कर्ष समोर आलेला आहे.
फेसबुकचा ॲडव्हर्टायजिंग खरेदी केल्यानंतर अमेझॉनला फेसबुकच्या या प्रेफरन्शियल डेटाबेसचा ॲक्सेस मिळाला हे त्यांनी कबुल केले.
व्हॉट्सअॅपवर मालकी हक्क प्रस्थापित केल्यानंतर व्हॉट्सअॅपवरचा डेटा फेसबुकवर शेअर करण्यासाठीची फेसबुकची योजना होती. त्या अर्थाने त्यांनी स्वत:ची डेटा पॉलिसीसुद्धा अपग्रेड केलेली होती.
परंतु याला युझर्सनी तीव्र नापसंती दर्शविल्यावर आमच्याकडून आम्ही असे काही करणार नाही असे स्पष्टीकरण फेसबुककडून आले, पण त्यानंतर देखील व्हॉट्सअॅप स्टेट्स फेसबुकवर शेअर करण्यासाठीचे पर्याय फेसबुकने खुले ठेवलेलेच आहेत.
जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकने एक महत्त्वाची घोषणा केलेली होती. व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तीनही अॅपसाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म बनवण्याची ती घोषणा होती.
त्यानुसार हे तीनही अॅप्स वेगवेगळे ऑपरेट केले तरी या तीनही अॅप वरून पाठवले गेलेले मेसेजेस एकाच नेटवर्क वरून पाठवले जातील अर्थात ते नेटवर्क फेसबुकच असणार!
या घोषणेवर अजून तरी कुठलं पुढंच काम झाल्याची बातमी नाही मात्र जर भविष्यात हे झालच तर निश्चितच त्याचा परिमाण मेसेजेसच्या सुरक्षिततेवर होवू शकतो.
यांनतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो ते आपण आपल्या डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करतो त्याच्या सुरक्षिततेचा. अगदी व्हॉट्सअॅप वेब हे फिचर येण्याच्या अगोदर कम्प्यूटरवरून व्हॉट्सअॅप फॉर डेस्कटॉप हे अॅप इंस्टॉल करण्याची सोय होती आणि आजही आहे.
अनेकदा फोन दूर असताना सोयीचे म्हणून अनेक युझर्स डेस्कटॉप वर चुकीच्या सोर्सेसवरून व्हॉट्सअॅप डाउनलोड करतात. याच्यातून छुपे मालवेअरसुद्धा आपल्या कम्प्यूटरमध्ये येवू शकतात.
अनेकदा नेट चालू असताना आपल्यासमोर whatsappweb.xx अशा डोमेन असलेल्या नकली वेबसाईट येतात. त्यात आपल्याला आपला फोन नंबर देण्याची विनंती केलेली असते.
अनेकदा खऱ्या आणि खोट्या वेबपेजचा फरक लक्षात न आलेले लोक अशा नकली पेज वर स्वत:चा नंबर देवून टाकतात आणि त्यातून तुमच्या नंबरवर अनेक स्पॅम लिंक्स येऊन थडकतात.
ज्याच्यावर क्लिक केलं तर सगळा डेटा नामशेष होण्याचा धोका असतो. व्हॉट्सअॅपचा एक दावा नेहमी असतो तो म्हणजे या अॅपवरून जे मेसेजेस जातात ते मध्ये कुठेही लिक होत नाहीत. मात्र या दाव्यात फारसे तथ्य नाही.
व्हॉट्सअॅपवरून जे काही मेसेजेस जातात त्याचा लोकल आणि क्लाउड बॅकअप घेण्याची सोय आहे. हा क्लाऊड बॅकअप आपण गुगल द्राईव्ह आणि आयफोनमध्ये आयक्लाउडवर घेऊ शकतो. मात्र क्लाउडवर सेव्ह केलेली फाईल पूर्णपणे एनक्रिप्टेड नसते याचा अर्थ जर उद्या ड्राईव्हचा ॲक्सेस जर कुठल्या हॅकरला मिळाला तर तो सहज हे सगळे मेसेजेस डिकोड करू शकतो.
व्हॉट्सअॅप मेसेजेसचा आणखी एक होणारा दुरुपयोग म्हणजे खोटे मेसेजेस वणव्यासारखे पसरले जाणे आणि त्यातून मॉब लिंचिंगसारख्या दुर्दैवी घटना घडणे. कुणीही काहीही मेसेज टाकतं आणि ते पुढे अनेक ठिकाणी शहानिशा न करताच फॉरवर्ड केले जातात.
अगदी साधे कुडमुडे ज्योतिषी मुले पळविण्याऱ्या टोळीचे सदस्य आहेत असे काही फोटो आणि संदेश व्हॉट्सअॅपला फिरले आणि निष्पाप ५ कुडमुड्या जोशी लोकांचा अमानुष मारहाणीमध्ये बळी गेला.
यासाठी आता व्हॉट्सअॅपने मेसेज पुढे पाठवणाऱ्याची संख्या मर्यादित केली आहे. आता व्हॉट्सअॅपवर आपण एक मेसेज फक्त ५ जणांना पुढे पाठवू शकत होतो.
याची जुनी मर्यादा २५० लोक इतकी होती. मात्र असे असूनही अनेक वेळा प्रचंड खोटी माहिती याद्वारे पसरवून लोकांची दिशाभूल केली जाते आणि खासकरून राजकीय वापरासाठी याचा प्रचंड प्रमाणात दुरुपयोग देखील केला जातो.
कायद्याने यावर थोडेफार नियंत्रण आणले आहे परंतु संपूर्णपणे याचा नायनाट झालाय असे घडलेले नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरच संभाषण संपूर्णपणे खरे आणि सुरक्षित आहे या दाव्यात फारसे तथ्य नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.