आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्राचीन गुप्तहेर संस्था कशी होती, गुप्तहेरांची नियुक्ती कशी होत असे, ते कुठल्याही लोभाला बळी पडू नयेत म्हणून कोणती खबरदारी घेतली जात होती आदी बाबींची माहिती देणारा हा लेख..
गुप्तहेरांना गूढ पुरुष, चर, चार, यथार्हवर्ण, स्पश अशी विविध नावे आहेत. चर किंवा चार म्हणजे जो सतत चालतो. बातम्या मिळवायच्या म्हणजे सतत फिरले पाहिजे, समाजात वावरले पाहिजे, एका जागी बसून हे काम होणार नाही म्हणून तो चर.
यथार्हवर्ण याचा अर्थ हवा तसा वेश घेणारा. समाजातील ज्या स्तरात तो जाईल तेथे त्या त्या वेषात त्याला वावरता आले पाहिजे. स्पश या संस्कृत धातूचा अर्थ आहे थांबवणे, पाहणे किंवा स्वीकारणे.
थोडक्यात कार्यानुसार हवे ते रूप घेऊन सर्व काही पाहणारा असे वरील शब्दांचे विविध अर्थ आहेत. गूढ पुरुषांच्या नियुक्तीला प्राचीन काळी फार महत्त्व होते.
गुप्तहेर: राजाचे चक्षू
मनूने राजाला ‘चारचक्षूमहीपति:’ म्हटले आहे. याचा अर्थ राजा कोण तर गुप्तहेर हेच ज्याचे डोळे आहेत तो राजा. रामायणातदेखील दूर राहूनही राजा गुप्तहेरांद्वारे सर्व गोष्टी पाहातो म्हणून त्याला चारचक्षू म्हटले आहे.
तर हितोपदेशात स्वत:च्या व शत्रूच्याही राष्ट्रातील कार्य व अकार्य यांचे अवलोकन करणारा राजा अंध नसतो असे सांगितले आहे. कौटिलीय अर्थशास्त्र या राजनीतीवरील प्राचीन ग्रंथात गूढ पुरुषांवर विस्तृत चर्चा आहे.
“राजाने आपले हेर शत्रूच्या दरबारात, मित्र-राजांच्या दरबारात, मध्यम भूमिका घेणाऱ्या राजांच्या दरबारात आणि तटस्थ राजांच्या दरबारात, (त्या) राजांची तसेच त्यांच्या अठरा प्रकारच्या उच्च अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी ठेवावेत.” असे कौटिल्य अर्थशास्त्र स्पष्टपणे सांगते.
कौटिल्याने संस्था व संचारी असे गुप्तहेरांचे दोन प्रकार केले आहेत. नेमून दिलेल्या जागी राहून आपले कार्य करणाऱ्या गुप्तहेरांना “संस्था” असे म्हटले आहे. यात विद्यार्थी, गृहस्थ, व्यापारी, साधू-संन्यासी, शेतकरी यांचा समावेश आहे.
यांपैकी ज्या लोकांजवळ उपजीविकेचे साधन उरलेले नाही, जगण्याची भ्रांत आहे, पण जे बुद्धिमान व राष्ट्रावर प्रेम करणारे, शुद्ध आचरणाचे आहेत अशा लोकांना गुप्तहेर नेमण्यास कौटिल्य सांगतो.
कौटिल्य किंवा चाणक्याने विद्यार्थ्यांना गुप्तहेर नेमण्यास सांगण्याचे प्रमुख कारण म्हणजे वयाने लहान असल्यामुळे स्त्रियांशीसुद्धा भिक्षेच्या मिषाने मोकळेपणी संपर्क करणे त्यांना शक्य होते. पण हा विद्यार्थी बुद्धिमान, चतुर व दुसऱ्याचे मर्म जाणण्यात निष्णात असला पाहिजे.
संचारी गुप्तहेरांमध्ये सत्री, तीक्ष्ण, रसद व भिक्षुकींचा समावेश आहे. जे जादूटोणा, भविष्य, इंद्रजाल, शकुनशास्त्र जाणणारे, पशुपक्ष्यांची भाषा जाणणारे, चार आश्रमांची कर्तव्ये माहिती असलेले ते सत्री. अत्यंत शूर, काम करताना प्राणांचीसुद्धा पर्वा न करणारे, क्रू*र जंगली श्वापदांशी लढण्याची हिंमत असलेले ते तीक्ष्ण, कार्य करताना नात्यातील माणसांचेही स्मरण न ठेवणारे, अत्यंत क्रू*र, विष देणारे ते रसद.
इसवी सन पूर्व काळात कौटिल्याने भिक्षुकी म्हणजे स्त्रियांचाही समावेश गुप्तहेरांमध्ये केला आहे हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
या हेरांची नियुक्ती केवळ शत्रू राष्ट्रातच नव्हे तर स्वराष्ट्रातदेखील करावी. कारण स्वराष्ट्रातील असंतोष हा फार भयानक असतो.
परकीय आक्र*मण झाल्यास असे असंतुष्ट राष्ट्र राजाच्या बाजूने उभे राहात नाही, म्हणून राजाने स्वराष्ट्रातील असंतोषाची कारणे गुप्तहेरांमार्फत जाणून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करावा किंवा अकारण संतप्त असतील त्यांना कठोर शासन करावे. त्यासाठी राजाने राजकुमारपासून सर्व मंत्र्यांच्या पाठी गुप्तहेर नेमले पाहिजेत असे कौटिल्याचे मत आहे.
गूढ पुरुषांची रूपे
गूढ पुरुषांनी कोणती रूपे घ्यावीत याची फार मोठी यादी अर्थशास्त्रात आहे. राजा किंवा मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या मस्तकावर छत्री धरणारे, पालखीचे भोई, वाहनांचे सारथी, पाणी देणारे, अंथरूण घालणारे, जेवण देणारे व वाढणारे, स्नान घालणारे, मसाज करणारे (आज मोठमोठ्या स्पा सेंटरचे कौतुक वाढत आहे. सुनंदा पुष्कर यांचा दुबईत फार मोठा स्पा होता तेथे अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्तींची वर्दळ असते या वृत्ताकडे विशेष लक्ष वेधावेसे वाटते.), केस कापणारे अशी विविध कामे करण्याच्या निमित्ताने त्या त्या रूपात गुप्तहेरांनी काम करावे.
त्याने आंधळे, मुके, बहिरे, मंदबुद्धी अशी विविध रूपे घ्यावीत. याशिवाय साधू-संन्याशांच्या रूपात फार मोठ्या प्रमाणात गुप्तहेरांनी काम करावे असे चाणक्याने सुचवले आहे.
हितोपदेशातदेखील तपस्व्यांच्या वेषात पवित्र तीर्थक्षेत्रे, आश्रम, देवस्थाने इत्यादी ठिकाणी शास्त्र व धर्मचर्चेच्या हेतूने गुप्तहेरांनी संवाद साधावा असे सांगितले आहे. या ठिकाणी १८५७ च्या उठावात साधू-संन्यांशांनी केलेले योगदान आपल्याला विसरून चालणार नाही.
या साधू-संन्याशांविषयी एक खूप मजेशीर पण विचार करायला लावणारे सूत्र कौटिल्याने दिले आहे. ‘चमत्काराशिवाय साधू नाही’ अशी आपल्याकडे म्हण आहे. त्यामुळे साधूवेषातील गूढ पुरुषांनी महिन्या-दोन महिन्यांतून एकदाच मूठभर अन्न ग्रहण करावे.
पण इतके अल्प अन्न खाल्ले तर कोणी जिवंत राहू शकणार नाही, अशा परिस्थितीत हे सूत्र देणारा कौटिल्य मूर्ख नक्कीच नव्हता. केवळ समाजमनावर प्रभाव पाडण्यासाठी काहीतरी चमत्कार साधूंनी दाखवला पाहिजे म्हणून कौटिल्याने असे सांगितले आहे.
पण पुढे मात्र तो न विसरता ‘गूढमिष्टमाहारम’ म्हणजे गुप्तपणे हवे ते खाण्यास सांगतो.
कारण साधू तयार करणं हा काही त्याचा हेतू नाही. याच संन्याशांच्या शिष्यांनी, ‘हा महान तपस्वी आहे, तो संपत्ती प्राप्त करून देतो, त्याच्यामुळेच मला उद्योगधंद्यात फार फायदा झाला,’ अशी बतावणी लोकांमध्ये करावी. त्यामुळे लोक त्याच्याकडे आकृष्ट होतील.
अनेकदा एखादी व्यक्ती संत म्हणून अचानक नावारूपाला येते. काही वर्षांत खूप मोठी होऊन लोप पावते. क्वचित प्रसंगी समाजाला फसवल्याच्या आरोपावरून अशा साधूंना पकडल्याची उदाहरणेसुद्धा पाहायला मिळतात. अशा वेळी या अचानक मोठे होणाऱ्या साधूंच्या मागे लागण्यापेक्षा ते साधू म्हणून कसे मोठे झाले याचा शोध घेण्याची गरज असते.
समाजमन या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. मात्र शासनाने या लोकांवर बारीक नजर ठेवण्याची गरज असते. पण दुर्दैवाने आपल्याकडे ते होताना दिसत नाही.
हेरगिरी म्हणजे मोठे जोखमीचे काम, शत्रूकडून पकडले गेल्यास मृत्यू हीच शिक्षा म्हणून त्यांना योग्य तो पैसा व मान देऊन त्यांची नियुक्ती करायला चाणक्याने सांगितले आहे. या गुप्तहेरांनी योग्य-अयोग्य जे जसे दिसेल ते तसेच्या तसे राजाला सांगितले पाहिजे. त्यात कोणताही बदल करू नये. कारण राजाच्या योजना त्यांच्या शब्दावर अवलंबून असतात.
गुप्तहेरांचे गुण
बातम्या काढायच्या म्हणजे समाजाच्या विविध स्तरांत वावरावे लागते. यासाठी गुप्तहेरांना वेगवेगळ्या भाषा अवगत असणे आवश्यक आहे (हेरगिरीसाठी पकडलेल्या माधुरी गुप्ता यांना उर्दू उत्कृष्ट येते हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.) याशिवाय त्यांचे संसर्ग विद्यांचे ज्ञान उत्तम असले पाहिजे.
संसर्ग विद्यांमध्ये संगीत, नृत्य, नाट्य, कथाकथन अशा विषयांचा समावेश होतो. २६/११ च्या मुंबईवरील ह*ल्ल्यानंतर भारतातील काही गायकांनी पाकिस्तानातून भारतात येऊन कार्यक्रम करणाऱ्या पाक गायकांच्या हेतूविषयी शंका व्यक्त केली होती. पण दुर्दैवाने पाकप्रेमाचा पुळका असलेल्या शासनाने किंवा जनतेनेही त्या गोष्टीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नव्हते. असो…
रशियातील वेगाने बातम्या काढण्यात तरबेज असणाऱ्या पापाराझींची आठवण करून देणारे सूत्र कौटिल्याने दिले आहे. तो म्हणतो ‘शीघ्रचार परंपरा’ ह्या चारांनी पापाराझींप्रमाणे अतिशय वेगाने बातम्या काढल्या पाहिजेत. तेथे दिरंगाई होऊन अजिबात चालणार नाही.
गुप्तहेरांची नेमणूक करताना तो नियुक्ती हा शब्द न वापरता वाप म्हणजे पेरणे या धातूचा उपयोग करतो तेव्हा त्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. कारण जमिनीत बी पेरायचे म्हणजे एक किंवा दोन बिया पेरून चालत नाहीत त्यासाठी अनेक बिया टाकाव्या लागतात.
कौटिल्यसुद्धा एका बातमीसाठी तीन तीन हेरांची नेमणूक करण्यास सांगतो. घाईने निर्णय घेऊन कोणावर अन्याय होऊ नये म्हणून या तिघांच्या सांगण्यात एकवाक्यता आली की मगच राजाने निर्णय घ्यावा असे नमूद केले आहे.
कधी कधी या गुप्तहेरांना बातमी योग्य ठिकाणी पोचवण्यासाठी महालाबाहेर पडणे कठीण होते अशा वेळी बाहेरील गुप्तहेरांनी महालातील हेरांच्या आई-वडिलांच्या रूपात महालातील हेरांना भेटावे अथवा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गायक, नट, नर्तक अशा विविध रूपात महालात प्रवेश मिळवावा.
एवढे करूनही महत्त्वाची बातमी बाहेर काढता नाही आली तर आजारी असल्याची किंवा वेड लागल्याची बतावणी करावी. सगळी काळजी घेऊनसुद्धा शत्रूगोटातून बाहेर पडता आले नाही तर मात्र कोणतीही तडजोड न करता सरळ महालाला आग लावून बाहेर पडण्याची कठोर सूचना कौटिल्य देतो.
गुप्तहेर फितूर होऊ नयेत म्हणून घ्यावयाची खबरदारी-
अनेक कठोर परीक्षांनंतर गुप्तहेरांची नियुक्ती होत असली तरी शेवटी तीही माणसंच असतात. अशा परिस्थितीत त्याच्या हातून गुन्हा होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी ते अर्थशास्त्रात सांगितले आहे.
१. कौटिल्य म्हणतो, “न चान्येन्यं संस्थास्ते वा विद्यु:” या संस्था किंवा गुप्तहेरांना परस्परांची कोणतीही माहिती नसावी.
२. कधी कधी आपल्याला आपले गुप्तहेर शत्रूराष्ट्रात पाठवावे लागतात. अशा वेळी आपल्या राष्ट्राशी पटत नसल्याची भलावण करत हे हेर शत्रूराष्ट्रात जातात व शत्रूराष्ट्राबरोबर सहकार्य करतात. शत्रूराष्ट्रसुद्धा त्यांचा उपयोग करून घेऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांना दोन्ही राष्ट्रांकडून वेतन मिळते. या हेरांना कौटिल्य उभयवेतन असे म्हणतो.
पण या हेरांना स्वराष्ट्रापेक्षा शत्रूराष्ट्राकडून अधिक फायदा होत असेल तर ते स्वराष्ट्राशी फितूर होण्याचा धोका असतो. म्हणून त्यांची उभयवेतन अशी नियुक्ती करण्यापूर्वी त्यांचे कुटुंबीय आपल्या ताब्यात घेऊन मगच त्यांना उभयवेतन म्हणून नेमावे असे कौटिल्याने स्पष्टपणे बजावले आहे.
३. एखाद्या हेराच्या बातम्यांत सातत्याने चुका होऊ लागल्यास त्याला प्रथम समज द्यावी पण इतके करूनही त्याच्या वागणुकीत बदल न झाल्यास त्याला लगेच कामावरून कमी करण्याची सूचना कौटिल्याने दिली आहे. मात्र कधी कधी स्वराष्ट्राविषयी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती तो शत्रूराष्ट्राला पुरवू लागला तर मात्र कोणतीही दयामाया न दाखवता त्याला गुप्तपणे ठार करण्यास सांगतो. कारण राष्ट्रनिर्माणात कुठलीच तडजोड कौटिल्याला मान्य नाही.
लेखक: तुषार दामगुडे
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.