इंदिरांची आणीबाणी ते राहुल-मोदींची मिठी, प्रत्येक घटनेवर मिश्कील भाष्य करणारी खोडकर ‘अमूल गर्ल’

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अटरली बटरली डीलीशीअस!

अमूलच्या त्या कार्टून गर्लशी आणि या वनलायनरशी आपण इतके एकरूप झालो आहोत की अमूल हा ब्रँड आपल्या जीवनाचा एक भागच बनला आहे. अमूलच्या जाहिराती आणि वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या कार्टून्सनी आपले रोजच्या रोज मनोरंजन तर होत असतेच शिवाय त्या ब्रँडच्या प्रॉडक्टसने देखील आज आपल्या घरात जागा मिळवली आहे.

खरंतर अमूलच्या वन लायनर टॅगलाईन ‘अटरली बटरली डिलिशियस’ला बटरली हा शब्द इंग्रजी व्याकरणानुसार चुकीचा असल्यामुळे विरोध झाला होता, पण हाच शब्द कॅरी ऑन करण्यात आला आणि आज प्रत्येकाच्या तोंडावर ‘अमूल’चे हे वनलायनर फिट बसले आहे.

आजवर अमूलने ४००० जाहिराती केल्या आहेत आणि अजून पुढे देखील अमूल जाहिराती करत राहणार आहे. अमूलच्या कार्टून्सने देखील लोकांच्या मनाची चांगलीच पकड घेतली आहे.

२०१५ साली राहुल गांधींनी संसदेत घेतलेली मोदींची गळाभेट त्यावर बनवलेल्या कार्टून्सपासून प्रियंका गांधी, राहुल गांधी, राजकारणात प्रवेश करणाऱ्या गौतम गंभीरपर्यंत, विरोधकांच्या ‘महा गठबंधन’ला ‘मस्का गठबंधन’ म्हणणे असो, प्रत्येक बाबतीत अमूलने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण जाहिरातीनी भारताच्या सामान्य नागरिकाला भुरळ घातली आहे. त्यावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पंचलाईनने लोकांना अजून आकर्षित केले आहे.

ज्यावेळी राहुल गांधींनी संसदेत मोदींना मिठी मारली त्यावेळी अमूलही रोज ब्रेडला अशाच प्रकारे मिठी मारत अशी दिलेली टॅगलाईन असो की मोदी जिनपिंग यांच्या भेटीनंतरच्या कार्टूनवरील ‘जिनपिंग विद जॉय’ अशी दिलेली टिपण्णी असो, अमूलच्या जाहिरातीच्या स्ट्रॅटेजीला तोड नाही.

अमूलचे कार्टून हे सामान्यपणे ताज्या घडामोडींवर आधारित असतात, त्यामुळे त्यांचा लोकांवर एक वेगळाच प्रभाव असतो. त्यातून बऱ्याचदा मनोरंजनही होते आणि प्रबोधन देखील, महत्वाचे म्हणजे लोकांचे ध्यान त्याकडे खेचले जाते!

अमूल बटरची ही जाहिरात गेल्या ५० वर्षांपासून अशीच अविरत सुरू आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अमूल कंपनी या जाहिरातीच्या विभागावर जास्त लक्ष घालत नाही, त्यात ढवळाढवळ देखील करत नाही.

अगदी अमूलचे प्रमुख व्यवस्थापक जयेन मेहता ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलखतीत म्हणाले होते की मलासुद्धा ह्या जाहिराती तेव्हाच बघायला मिळतात ज्यावेळी इतर लोक त्या बघतात.

१९६६ पासून अमूलच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्टूनची निर्मिती दा कुन्हा कम्युनिकेशन ही कंपनी करत असून, यामुळे अमूल कंपनीचा आणि या कार्टून जहिरात निर्मितीचा जास्त संबंध येत नसतो.

‘अमूल’ ची नोंदणी १९५७ मध्ये करण्यात आली, त्यानंतर भारतातील ‘श्वेतक्रांती’चे जनक आणि अमूलचे संस्थापक डॉ. व्हर्गिस कुरियन जाहिराती संबंधात जाहिरात क्षेत्रातील तज्ञ सिल्व्हेस्टर दा कुन्हा यांना जाऊन भेटले.

दा कुन्हा यांच्या येथील युस्टस फर्नांडिस या कलाकाराने ‘अमूल गर्ल’चे कार्टून १९६६-६७ मध्ये पहिल्यांदा रेखाटले होते.

सर्वात आधी अमूल गर्लची जाहिरात ‘Give Us the day with our daily bread : Amul Butter’ या वनलायनरसह प्रकाशित झाली होती, जिला लोकांकडून समाधानकारक रिस्पॉन्स मिळाला होता. लोकांना अमूल गर्ल फार क्युट वाटली होती.

दा कुन्हा यांच्या टीमच्या लक्षात आलं की ‘अमूल’च्या मार्केटिंगसाठी कशावर लक्ष केंद्रित करायचं, त्यानुसार त्यांनी रोजच्या घडामोडींवर आधारलेले अमूल गर्लचे कार्टून्स तयार केले. ज्यावेळी मुंबईत घोड्यांची स्पर्धा होती, त्यावेळी अमूलने ‘Throughbeard’ हे शीर्षक दिले होते, ही अमूलची या प्रकारची पहिली जाहिरात होती.

पुढे कलकत्त्यामध्ये डाव्या कामगार संघटनांनी बंद आणि हरताळीचे शस्त्र उपसले तेव्हा अमूलने ‘चोलबे ना, चोलबे ना’ अर्थात चालणार नाही, चालणार अशी वनलायनर टॅनलाईन देऊन त्यावेळीच्या डाव्या राजकारण्यांचे देखील मन जिंकले होते.

हळूहळू अमूलने भारतातील विविध घटनांवर आपल्या रंजक कार्टून्सच्या माध्यमातून भाष्य करून, लोकांची मने जिंकली.

डॉ. व्हर्गिस कुरियन यांचा दा कुन्हा यांच्या मार्केटिंगवर भरोसा होता आणि अमूलच्या कार्टूनचे विषय हे सामान्य जनतेशी कनेक्ट होणारेच असावे असा त्यांचा कायमच अट्टहास होता. पण कुरियन यांनी याव्यतिरिक्त कधीच दा कुन्हा यांच्या मार्केटिंगमध्ये ढवळाढवळ केली नाही, उलट ते या बाबतीत मुक्त होते. त्यांनी कधीच अडवणूक केली नाही.

बऱ्याचदा अमूलच्या काही कार्टून्सवर बऱ्याच लोकांनी आक्षेप नोंदवले, कायदेशीर तक्रारी दाखल केल्या पण व्हर्गिस कुरियन सदैव दा कुन्हा यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

अमूलच्या जाहिरातीमध्ये बदलत्या भारताचे चित्र रेखाटले जात होते. ज्यावेळी इंदिरा गांधींनी आणीबाणीत लोकांना नपुंसक बनवण्याचे काम सुरू केले त्यावेळी देखील अमूलने त्यांच्यावर निशाणा साधला होता. पुढे तियानमेन स्केअर मधील विद्यार्थ्यांचे हत्याकांड, बोफोर्स घोटाळा, जयललिता यांचा तुरुंगवास, बॉलिवूडमधील घडामोडी आणि रंजक घटना यावर अमूल गर्लचे कार्टून व वनलायनर टिपण्णी हे लोकांच्या फार पसंतीस उतरले.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यावर अमूलने आजवर तयार केलेले सर्व कार्टून्स जपून ठेवले आहेत.

आज अमूलच्या कार्टून्सची निर्मिती राहुल दा कुन्हा हे करत असून, कॉपी रायटर मनिष झवेरी आणि कार्टुनिस्ट जयंत राणे डिजाईन करतात. अमूलच्या कार्टून्समुळे आजही त्यांच्यावर बऱ्याच तक्रारी दाखल होत असतात. ते याला सामोरे देखील जातात. महत्वपूर्ण बाब म्हणजे अमूल या जाहिरातीसाठी आपल्या एकूण कमाईचा फक्त १ टक्का भाग खर्च करते.

अमूल हे ‘टेस्ट ऑफ इंडिया’ असल्याने त्यांना आपल्या पारंपरिक जाहिराती सोडून इतर काही करण्याची गरज नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!