आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
तुमच्यापैकी बहुतेकांनी शाहरुख खानचा ‘स्वदेस’ चित्रपट पाहिलेला असेल. लहानपणी कधीतरी गाव सोडून गेलेला ‘मोहन’ आपल्या मुळांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेतील नोकरी सोडून पुन्हा गावात येतो. गावातील लोकांमध्ये आल्यानंतर त्याला जो मान-सन्मान मिळाला तो पाहून त्याला ‘होम कमिंग’चा खरा अर्थ समजतो. अशीच काहीशी स्थिती काल (४ जानेवारी २०२१) एजाज पटेल या तरुणाची होती.
मुंबईचा समृद्ध वारसा आपल्यामध्ये सामावून घेतलेल्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर (Wankhede Stadium) काल एका भारतीय तरुणानं न्यूझीलंडसाठी इतिहास रचला. त्यानंतर त्याला स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं उभं राहून जो सन्मान दिला तो पाहून त्याला रियल ‘होम कमिंग’चा फिल आला असेल यात शंकाच नाही.
आपलं बालपण ज्याठिकाणी गेलं त्याठिकाणी येऊन आपलं कर्तृत्व दाखवण्याची फिलिंग जगात भारी असते, ही काही वेगळी सांगण्याची गोष्ट नाही. एजाज पटेल (Ajaz Patel) याने ही फिलिंग प्रत्यक्षात जगली. गेल्या चोवीस तासांपासून क्रिकेटमधील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी फक्त एकच नाव आहे, एजाज पटेल. क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकामध्ये सुवर्ण अक्षरात आपल नाव नोंदवणारा हा एजाज पटेल नेमका आहे तरी कोण आणि त्यानं वानखेडेवर अशी काय कामगिरी केली की त्याच इतकं कौतुक सुरू आहे?
१९५६मध्ये, आजपासून जवळपास सहा दशकांपूर्वी जिम लेकर (jim laker) नावाच्या ब्रिटिशानं टेस्ट क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये सर्वच्या सर्व १० विकेट्स घेऊन इतिहास रचला होता. त्यानंतर ७ फेब्रुवारी १९९९ रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर भारताचा महान स्पिनर अनिल कुंबळेनं त्या इतिहासाची पुनरावृत्ती केली. पाकिस्तानविरुद्ध परफेक्ट-१० ची नोंद करून कुंबळेनं (anil kumble) सर्व भारतीयांच्या माना अभिमानानं उंचावल्या होत्या.
जिम लेकर आणि अनिल कुंबळेच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं काम न्यूझीलंडचा स्पिनर एजाज पटेलनं शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर केलं. त्यानं जिम आणि जम्बोच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. त्यानं एका इनिंगमध्ये संपूर्ण भारतीय टीमला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्याचा भीम पराक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. ऑकलंडमध्ये वाढलेल्या आणि नवीन देशामध्ये राहण्याची सवय लावून घेण्यासाठी धडपड करणाऱ्या एजाजनं कधीही एका एनिंगमध्ये १० विकेट्स घेण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं.
संपूर्ण भारतीय संघाला आऊट करण्याची किमया करणारा एजाज अस्सल मुंबईकर छोकरा आहे. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये त्याचं बालपण गेलेलं आहे. लहान असताना मुंबईतील गल्ल्यांमधून फिरणाऱ्या लहानग्या एजाजनं स्वप्नातही विचार केला नसेल की एक दिवस तो दुसऱ्या कुठल्या तरी देशासाठी क्रिकेट खेळेल. पण, म्हणतात ना, माणसाचं नशीब त्याला कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही.
१९९६मध्ये एजाजच्या आई-वडिलांनी भारत सोडून न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एजाज फक्त आठ वर्षांचा होता. त्यापूर्वी एजाज जोगेश्वरीमध्ये राहत असे. त्याची आई ओशिवारातील एका शाळेमध्ये शिक्षिका होती तर वडिलांचा ‘रेफ्रीजरेशन’चा व्यवसाय होता. आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडला गेल्यानंतर एजाजला क्रिकेटची आवड निर्माण झाली. आत्ता सर्व जगासमोर एक स्पिनर म्हणून उभा असलेल्या एजाजला पेसर होण्याची इच्छा होती. सुरुवातीला काही काळ त्यानं पेसर म्हणूनच सराव केला. मात्र, न्यूझीलंडच्या अंडर १९ टीमचे कोच दीपक पटेल यांच्या सल्ल्यानुसार त्यानं स्पिन बोलिंग सुरू केली.
आपल्याकडे अलिखित पद्धत आहे. नोकरी व्यवयायानिमित्त बाहेरगावी गेलेली कुटुंब वर्षातून एकदा तरी आपल्या लेकरांना घेऊन आपल्या मूळगावी येतात. एजाज देखील या पद्धतीचा भाग आहे. आजही त्याचे अनेक नातेवाईक जोगेश्वरीमध्ये राहतात. त्याचा मोठा चुलत भाऊ ओवेस पटेल जोगेश्वरीमध्ये राहतो. आपल्या भावाला आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी वर्षातून एकदा तरी एजाज भारतात येत असे.
विशेष म्हणजे एजाज आयपीएलचा भाग नसूनही त्यानं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना सरावादरम्यान बोलिंग केलेली आहे. न्यूजीलंडमधील मित्र आणि मुंबई इंडियन्सचा पेसर मिशेल मॅक्लेनघनच्या ओळखीवर तो आयपीएलच्या मॅच पाहण्यासाठी वानखेडेवर यायचा. एकदा त्यानं सराव करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंसाठी बोलिंग केली होती. या वानखेडेवर आपण एक दिवस इतिहास रचू याची त्याला यत्किंचितही कल्पना नव्हती.
एका इनिंगमध्ये १० विकेट्स घेणाऱ्या एजाजला केवळ १० सामने खेळण्याचा अनुभव आहे. २०१८मध्ये युएईत झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला न्यूझीलंड टीमकडून पहिला कॉल-अप मिळाला होता. दुखापतग्रस्त मिचेल सँटनरच्या अनुपस्थितीमुळं त्याला टीममध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्याने ती दोन्ही हातांनी घट्ट पकडली. त्यानं कसोटी पदार्पणातच सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
सध्या वानखेडेवर सुरू असलेला सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अकरावा सामना आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्यानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या कसलेल्या खेळाडूंच्या विकेट्स घेऊन आपली क्षमता सिद्ध केली होती. पुजारा आणि कोहलीला तर आपलं खात खोलण्याची देखील संधी त्यानं दिली नाही.
वृद्धिमान साहाला माघारी पाठवून एजाजनं आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन, शतकवीर मयंक अग्रवालसुद्धा पटेलच्या फिरकीमध्ये अडकले. अक्षर पटेलच्या रुपात त्याला आठवी विकेट मिळाली. त्यानंतर जयंत आणि मोहम्मद सिराजला आउट करून त्यानं इतिहास रचला.
१० विकेट्स घेतल्यानं एजाजवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जेव्हा प्रतिस्पर्ध्यांचं कौतुक करण्याची वेळ येते तेव्हा भारतीय खेळाडू कायम पुढे असतात. ही गोष्ट जन्मानं भारतीय असलेल्या एजाजनं प्रत्यक्ष अनुभवली. वानखेडेवर ज्याक्षणी एजाजनं १०वी विकेट घेतली त्यावेळी भारतीय ड्रेसिंगरूममधील प्रत्येक व्यक्तीनं उभं राहून टाळ्या वाजवल्या.
कसोटीचा दुसरा दिवस संपला तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कोच राहुल द्रविड या दोघांनी न्यूझीलंडच्या ड्रेसिंगरुममध्ये जाऊन एजाजचं अभिनंदन केलं. एजाज सारखा पराक्रम करणारा दिग्गज भारतीय स्पिनर अनिल कुंबळेनं देखील एजाजची स्तुती केली. सध्या मैदानावर एजाजचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रविचंद्रन अश्विननं तर मुक्त कंठाने एजाजची स्तुती केली आहे. अश्विननं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एजाजसाठी खास पोस्ट केली आहे.
एका इनिंगमध्ये १० विकेट्स मिळणं हा नशीबाचा भाग समजला जातो. मात्र, त्यामागे त्या खेळाडूचे असणारे कष्ट कुणीही नाकारू शकत नाही. एजाजनं देखील हा टप्पा गाठण्याची प्रचंड कष्ट केले आहेत. त्याच्या कष्टांना यशही मिळालं. आपल्या मायभूमीमध्ये त्याला दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्याचं प्रेम मिळत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.