आगरकरांचे आर्यत्व : सावरकरांच्या हिंदुत्वाची मुख्य प्रेरणा ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लेखक: प्रा.संतोष शेलार 

१९ वे शतक हे भारतीय इतिहासातील प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. इंग्रजी राजवटीबरोबर येथे आलेल्या प्रगत अशा पाश्चात्य संस्कृतीने भारतीय संस्कृतीतील आचार विचारांना तीव्र धक्के दिले. त्याची प्रतिक्रिया व प्रतिसाद म्हणून भारतात प्रबोधनाला सुरवात झाली. या काळात जे सुधारक निर्माण झाले त्यात आगरकरांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

gopal ganesh agarkar postman
Spontaneous Order

आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी सुधारक होते. भारतात राजकीय, सामाजिक, धार्मिक इ. सर्वांगीण सुधारणा एकाच वेळी व्हाव्यात असे त्यांना वाटे. आगरकर हे कट्टर राष्ट्रवादी होते. राष्ट्रावादात आपल्या पूर्वजांचा इतिहास, धर्म, परंपरा, संस्कृती इ. गोष्टींचा अभिमान वाटणे आवश्यक मानले गेलेले आहे.

आगरकरांनाही असा अभिमान वाटतो. हिंदू धर्म, हिंदू समाज यांचा व आपण हिंदू असल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांचे सामाजिक विचार, त्यांचे राजकीय विचार, त्यांची धर्म व धर्मांतरविषयक भूमिका, राष्ट्रवाद, हिंदू – मुस्लीम प्रश्नाचे त्यांचे आकलन इ. बाबतीत त्यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण विचार प्रकट केलेलं आहेत.

आगरकरांचा रूढार्थाने कोणत्याही धर्मावर विश्वास नव्हता. कोणताही धर्मग्रंथ अगर परंपरा ते प्रमाण मानत नसत. ते ईश्वरालाही मनात नसत. याबाबतीत ते अज्ञेयवादी होते. असे असूनही हिंदू हे हिंदूच राहिले पाहिजेत असे त्यांना वाटते. आपले आर्यत्व किंवा हिंदूपण टिकले पाहिजे असे त्यांना वाटते. त्यांची हि भूमिका नीट समजून घेण्यासाठी त्यांचे धर्म, हिंदू समाज, धर्मांतर, राष्ट्रवाद, हिंदू – मुस्लीम समस्या याविषयीचे विचार समजून घेणे महत्वाचे आहे.

आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरु करताना जे जाहीर पत्रक काढलेले होते, त्यातच त्यांनी आपली ‘आर्यत्व’ जपण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या पत्रात आगरकरांनी अगदी थोडक्यात इतिहासाचा आढावा घेतला आहे. यापुढे आपण काय केले पाहिजे याचे दिग्दर्शन केले आहे.

या पत्रकात आगरकर म्हणतात, “मुसलमाना लोक आम्हाहून म्हणण्यासारखे सुधारले नव्हते. म्हणून त्यांच्या अंमलात आम्ही अगदीच नष्ट झालो नाही. पण सध्या ज्या लोकांचा अंमल आपणावर आहे त्यांच्या व आमच्या सुधारणेत बहुतेक बाबतीत जमीन अस्मानाचे अंतर असल्यामुळे त्यांच्यातील अनुकरण करण्यासारख्या गोष्टी आम्ही उचलल्या नाहीत व जे जुने व घरचे ते सारे चांगले हा हेका धरून बसलो तर उत्तर अमेरिकेतील इंडियन लोकांप्रमाणे आपली दशा होईल.

हा भयंकर प्रसंग आपणावर न यावा व भारतीय आर्यत्व नष्ट न व्हावे हे इष्ट असेल तर. जीवनार्थ कलहात आमचा निभाव कसा लागेल हे शोधून काढून तद्नुसार वर्तन करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.” (१-१,२)

 

muhurram postman
Chapati Mystery

या उताऱ्यात आगरकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच येथे ‘आम्ही’ हा जो राष्ट्रावाचक शब्द वापरताना आगरकरांना हिंदू समाजच अभिप्रेत आहे. त्यांचे आर्यत्व म्हणजे हिंदुत्वच आहे. ‘सुधारक काढण्याचा हेतू’ या आपल्या पहिल्याच लेखात आगरकरांनी हीच गोष्ट स्पष्ट केली आहे.

ते लिहितात,

“हिंदू लोक रानटी अवस्थेतून निघाल्यावर काही शतकेपर्यंत राज्य, धर्म, नीती वगैरे काही शास्त्रे, वेदांत, ज्ञान काही विद्या व काव्य, गीत, नर्तन, वादनादी काही कला यात त्याचे पाउल बरेच पुढे पडल्यावर त्यांची सुधारणेची वाढ खुंटली व तेव्हापासून इंग्रजी होईपर्यंत ते कसेतरी राष्ट्रत्व सांभाळू राहिले!” (१–७,८)

इतिहासाचा असा आढावा घेऊन पुढे ते लिहितात, “येथे एवढेच सांगितले पाहिजे की, मुळ प्रकृती म्हणजे भारतीय आर्यत्व न सांडता या पाश्चिमात्य नवीन शिक्षणाचा व त्याबरोबर या नवीन कल्पना येत आहेत त्यांचा आम्ही योग्य रीतीने अंगीकार करत गेलो तरच आमचा निभाव लागणार आहे” (१-८) आगरकरांचे हे लिखाण इतके सुस्पष्ट आहे की त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.

आगरकरांच्या समाजकारणावरही या आर्यत्वाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. अस्पृश्यतेवर प्रहर करताना ते लिहितात, “उच्च वर्गात जन्माला आलेल्या लोकांनी नीच वर्गात जन्मास आलेल्या लोकांस अपवित्र व अस्पर्श्य मानणे याहून मनुष्याच्या विचारीपणास लांच्छनास्पद अशी दुसरी गोष्ट नाही.

 

untouchability postman
The Logical Indian

‘न वदेत् यावनी भाषां प्राणौ: कठगतैरपि’ एवढा ज्या महंमद याविषयी आम्हास तिरस्कार होता, त्या गोहत्या करणाऱ्या म्लेंच्छांचे व तत्समान युरोपियनांचे, राज्याधिकारामुळे आम्हास काहीच वाटेनासे होऊन, ज्यांना वैदिक धर्म शिरसावंद्य ज्यांचा धर्म व आचार हिंदू जे अनादी कालापासून हिंदुस्थानचे रहिवासी, ज्यांच्या हातून गोवध होत नाही,

ज्यांना मदिरापानादी मनुष्यतेचा भंग करणाऱ्या व्यसनांचा म्हणण्यासारखा नाद नाही अशा हिंदूंचा आम्ही तिरस्कार करतो, त्यांना स्पर्श करण्यास भितो आणि त्याहून अनेक कारणांमुळे अस्पर्श्य अशा परकीयास गृढालिंगन देतो हे केवढा प्रमाद होय? यावरून कोणी असे समजू नये कि हिंदुतील श्रेष्ठ जातींनी नीच हिंदुंप्रमाणे पराकीयांचाही तिरस्कार करू लागावे, असे आमचे म्हणणे आहे.

आमचे म्हणणे इतकेच आहे कि त्यांची वरच्यांशी निदान परकीयांप्रमाणे तरी वागण्यास मागे-पुढे पाहू नये.” (१-६५) आगरकरांच्या सामाजिक विचारातही हिंदुत्व डोकावते. तसेच वरील विचारातून त्यांचा आप-पर भावही स्पष्ट झालेला आहे.

आगरकर आणि धर्मांतर –

आगरकर हे धर्मांतराचे कठोर टीकाकार आणि विरोधक आहे. ते म्हणतात, “आम्ही चालू हिंदू धर्मावर कितीही तीक्ष्ण प्रहर केले तथापि आमचा देश ख्रिस्ती व्हावा हि नुसती कल्पनाही आम्हास सहन होणारी नाही. आमच्यातील अतिशूद्र लोकाना आम्ही अगदी दूर टाकल्यामुळे त्यांची एकसारखी ख्रिस्ती धर्माकडे धाव चालू आहे.

 

christian conversion postman
The Tiny Man

ती गोष्ट आम्हास अत्यंत उद्वेगजनक आहे व या लोकांस आम्ही जवळ घेऊ लागून त्यांचा तिकडील ओघ परत फिरेल तो सुदिन असे आम्हास वाटत आहे.” (२-७४)

वरील विचारांवरून स्पष्ट होते कि, धर्मांतर आगरकरांना पसंत नाही. एवढेच नव्हे तर धर्मांतरीतांना परत हिंदुधर्मात घ्यावे असे त्यांचे मत होते. बळाने धर्म लादणाऱ्यांविषयी त्यांच्या मनात राग आहे.

तसेच असा अन्याय सहन करून गप्प राहणाऱ्या व सामाजिक सुधारणाबाबत सनातनी व आक्रमक भूमिका स्वीकारणाऱ्या हिंदू समाजावर ते कठोर प्रहार करतात. ते म्हणतात, “भेकड, प्रतीष्ठाखोर हिंदू लोकांनो ज्या वेळेस पोर्तुगीज लोकांनी ख्रिस्ती धर्म स्थापण्यासाठी कोकणपट्टीत तुमचे अनन्वित हाल केले तेव्हा त्यावेळी तुमचा धर्माभिमान कोठे गेला होता?

विषयलंपट, निशक्त, वाचाळ बाबुंनो जेव्हा महंमदियांनी हिंदुस्थानच्या एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत साऱ्या हिंदू लोकास आपल्या धर्मवेडाने जर्जर करून सोडले व हिंदूंच्या मानावर असिधार ठेऊन तुम्हाकडून तुमच्या शेंड्या काढवल्या आणि तुम्हास गोमांस चारले तेव्हा धर्मरक्षणासाठी तुम्ही नुसता ओरडा तरी करावयाचा होता!” (१-१३६)

स्वधर्मरक्षण करू न शकणाऱ्या व सुधाराकावर मात्र चालून जाणाऱ्या हिंदू समाजाचा धर्माभिमान खोटा आहे असे त्यांना वाटते. विचारपूर्वक केलेले धर्मांतरही आगरकरांना नापसंत आहे.

पंडिता रमाबाईंविषयी आदर वाटत असूनही त्यांचे धर्मांतर करणे आगरकरांना आवडले नाही. (३-४८)  “गुलामांचे राष्ट्र” या लेखात आगरकरांनी विचार स्वातंत्र्याचे महत्व सांगताना धर्मांतराचे उदाहरण दिले आहे.

ते लिहितात, “बापाला वैदिक धर्म मान्य असून मुलाने आपल्या मानात बौद्ध धर्म चांगला आहे असे ठरवले तर त्याने पित्याची अवज्ञा केली असे कोणाच्यानेही म्हणवणार नाही.” (१-१७१) येथे आगरकरांनी धर्मांतर मान्य केले आहे.

 

pandita ramabai postman
AajTak

याच लेखात खरा सुधारक व दुर्धारक यातील फरक सांगताना आगरकरांनी परत धर्मांतराचे उदाहरण घेतले आहे. “हिंदू धर्मात बरीच व्यंगे आहे. म्हणून यहुदी, ख्रिस्ती, महंमदी किंवा अशाच प्रकारच्या दुसर्या एखाद्या धर्माचा अंगीकार करणाऱ्या मनुष्यास विचारी हि संज्ञा सहसा देता येणार नाही. ज्या देशात आपले शेकडो पूर्वज जन्मास आले, वाढले व मरण पावले, ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत केलेल्या सुधारणांचे फळ आपणास ऐतेच प्राप्त झाले – अशा देशातील धर्माचा, रितीरिवाजाचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकांची पदवी कधीही शोभणार नाही.” (१-१८३)

या एकाच लेखात आगरकरांनी धर्मांतराविषयी दोन वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. वरील उताऱ्यात ‘देशातील धर्माचा त्याग न करण्याविषयी उल्लेख आला आहे. त्यामुळे आगरकरांना वैदिक धर्मातून बौद्ध धर्मात होणाऱ्या धर्मांतराला विरोध नाही. कारण दोन्ही धर्म याच देशात उगम पावले आहेत.

यहुदी, महंमदी, ख्रिस्ती धर्मात झालेले धर्मांतर त्यांना मान्य नाही. कारण या धर्मांचा जन्म भारताबाहेर झाला आहे. म्हणून आगरकर या धर्मांना ‘देशातील धर्म’ मानावयास तयार नाहीत. आगरकरांची हि भूमिका सावरकरांच्या ‘पुण्यभू’ या संकल्पनेप्रमाणेच आहे असे वाटते. सावरकरांनी हिंदू कोणाला म्हणावे हे सांगण्यासाठी जी सर्वप्रसिध्द व्याख्या केली आहे ती पुढीलप्रमाणे –

आसिंधुसिंधूपर्यंता यस्य भारत भूमिका |
पितृभू पुण्यभूश्चैव स वै हिंदूरिती स्मृतः || (६-१००)

आसिंधुसिंधू पसरलेली भारतभू ज्याची पितृभू व पुण्यभू आहे तो हिंदू होय. भारतात राहणाऱ्या सर्वांचीच पितृभू भारत आहे. व्यक्तीचा धर्म ज्या देशात उगम पावला अथवा जन्माला तो देश त्या व्यक्तीची पुण्यभू ठरतो.

या व्याख्येमुळे वैदिक, बौद्ध व जैन इत्यादि भारतात जन्म पावलेले धर्म हिंदू ठरतात. तर मुस्लीम व ख्रिश्चन हिंदुत्वाच्या कक्षेतून वगळले जातात. आशयाच्या दृष्टीने पाहिल्यास आगरकर या विचारांबाबतीत सावरकरांचे पूर्वसुरी ठरतात. दोघांनाही या कक्षेबाहेर होणारे धर्मांतर मान्य नाही.

या विचारांना काहीसा छेद देणारे विचारही आगरकरांनी मांडले आहेत. महार, मांग वगैरे अस्पृश्यांची स्थिती हिंदू धर्मात राहून सुधारणार नाही. सवर्ण हिंदू अस्पृश्यांना समान सामाजिक हक्क द्यायला तयार होणार नाहीत असे त्यांना वाटत होते. आपली स्थिती चागली होण्यासाठी अस्पृश्यांनी ख्रिस्ती व्हावे असाही उपदेश त्यांनी एकदा केला आहे.

आपण असा उपदेश का गेला याचे कारण सांगताना ते लिहितात, “आमच्या लोकांनी ख्रिस्ती व्हावे अशी आमची मुळीच इच्छा नाही. परंतु आमच्या इच्छेपेक्षा या लोकांची स्थिती अधिक महत्वाची असल्यामुळे आम्ही मोठ्या नाखुशीने हाच खरा उपाय हे कबुल केले आहे.” (३-२१३)

या विचारांवरून आगरकरांना अस्पृश्य बांधवांविषयी वाटणारी कळकळ तर स्पष्ट होते तसेच त्यांचे धोरण कुठे लवचिक होऊ शकते हेही स्पष्ट होते.

आगरकर आणि ‘हिंदू–मुस्लीम’ प्रश्न-

हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तंटे का होतात, याची आगरकरांनी सांगितलेली करणे अशी आहे – हिंदू आणि मुस्लीम यांचे आचार विचार एकमेकांपासून भिन्न आहेत. (२-४५७) या तंट्याची कारणे पुरातन आहेत म्हणजेच ती इतिहासात आहेत असेही ते म्हणतात. राष्ट्रभाषा व गोरक्षण या चळवळींची या तंट्यांचा संबंध नाही असे त्यांना वाटते. (२-४५९)

“अशाने निभाव कसा लागेल?” या लेखात आगरकर म्हणतात, “मुसलमान लोक शूर व धर्मवेडे आहेत; त्यांच्या शौर्यामुळे ते हिंदुस्थानचे राज्यकर्ते झाले; हिंदू लोकांशी त्यांचे जे वारंवार भांडण होते ते त्यांच्या धर्मवेडामुळे होते. या लोकांविषयी एवढ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे या विषयी सांगण्यासारखे सारे सांगितले असे होते.” (२-४७६) दंग्यात मुस्लिमांकडूनच प्रथम आगळीक होते असेही ते म्हणतात. (२-४५८)

हिंदू हे जात्या गरीब आहेत, ते आपणहून कोणावर तुटून पडावयाचे नाहीत असेही ते म्हणतात. (२-४७८) आगरकरांना येथे हिंदूंची बाजू न्याय्य आहे असे वाटते.

आगरकर लिहितात, “जोपर्यंत दुसऱ्या लोकांची डोकी धर्मवेडाने भणभणून गेली आहेत तोपर्यंत त्यांच्याशी संबंध पडणाऱ्या लोकांतही धर्माभिमानाचे थोडेसे वारे असले पाहिजे. नाहीतर त्यांच्या हातून स्वधर्माचे संरक्षण व्हावयाचे नाही. हिंदू लोकांचा धर्माभिमान इतक्या पुरताच आहे व तो श्लाघ्य आहे. (२-४७६)

 

hindu Postman
Pragyata.com

या दंग्यांविषयी ब्रिटीश अधिकारी हिंदुंना पक्षपाती वागणूक देतात कि नाही, या प्रश्नाचे उत्तर आगरकरांनी वेगवेगळ्या लेखात वेगवेगळे दिले आहे. १८९३ चे जे लेख आहेत त्यात ब्रिटिशांवर असा आरोप करणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. (२-४५३, ४५९, ४७८) तर १८९४ सालच्या लेखात आगरकरांना ब्रिटिशांविषयी अशी शंका आलेली आहे. (२-४९७,५०१)

मुस्लिमांना झुकते माप देणाऱ्या ब्रिटीशांना ते बजावून सांगतात कि हिंदुंविरुद्ध मुसलमानांची मैत्री त्यांना उपयोगी पडणार नाही. ते लिहितात,

“जेव्हा आम्ही हिंदू लोक ब्रिटीश पलटणींची पर्वा न करता ब्रिटीश लोकांच्या हातून आपले राज्य हिसकावून घेण्यास तयार होऊ शकतो तेव्हा त्या बरोबर त्यांना टेकू देणाऱ्या मुसलमान लोकांचाही समाचार आम्हास घेता येणार आहे.” (२-५०१)

येथे मुस्लिमांवर त्यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. मुस्लीम हे राजकीय चळवळीस विरोध करतात असेही त्यांनी म्हंटले आहे. (२-५००) सारेच मुस्लीम तसे नसले तरी बहुतांश तसेच आहेत असे त्यांना वाटते. (२-५००) अर्थात हिंदू व मुस्लीम यांच्यात ऐक्य व्हावे असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी त्यांनी काही उपायही सांगितले आहेत.

ते लिहितात, “दोघेही अगदी निराळ्या धर्माच्या तिसऱ्याच राष्ट्राची प्रजा झालो. दोघांनीही आपल्या उन्नतीचा उपाय करणे जरूर आहे. ज्याप्रमाणे पूर्ववैभवाचे स्मरण करून मुसलमानांनी आजमितीस शेखी मिरवण्यात अथवा हिंदुंशी अरेरावी करण्यात अर्थ नाही त्याप्रमाणे मुस्लिमांनी पूर्वी केलेली अनन्वित कृत्ये आठवून त्यांचा द्वेष करण्यात किंवा खिजवण्यात शहाणपण नाही.” (२-४५२, ४५३)

“मुस्लीम लोकांचा खरा तरणोपाय हिंदू लोकांशी एकमत करण्यात आणि जोडीने ज्ञान, संपत्ती व राजकीय हक्क संपादण्यात आहे असे आम्हांस वाटते.” (२-४७५)

वरील सर्व विचारावरून असे वाटते कि, आगरकरांचा राष्ट्रवाद सावरकरांच्या हिंदुत्ववादासारखाच आहे. जेव्हा ते राष्ट्राचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर फक्त हिंदू समाज असतो. ख्रिश्चनांना ते परकीय मानतात, मुसलमानांवरही त्यांचा विश्वास नाही. राष्ट्रवादाची अशीच हिंदू समाज केंद्रित मांडणी सावरकरांनीही केली आहे.

 

savrkar postman
India Today

आपल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात सावरकर म्हणतात, “हिंदी राष्ट्राचा मूळ पाया, आधारस्तंभ, निर्वाणीचे त्राते ‘हिंदू’ लोकच आहेत.” (६-१२१) आगरकर आणि सावरकर यांच्या विचारातील हे विलक्षण साम्य सर्वप्रथम प्रा. शेषराव मोरे यांनी प्रकाशात आणले. ते म्हणतात, “आगरकरांचे आर्यत्व म्हणजेच सावरकरांचे हिंदुत्व होय.” (५-४९३)

हिंदुत्वाच्या बाबतीत आगरकर हे सावरकरांच्या गुरुस्थानी आहेत असेही मत प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले आहे. (५-५००) असेच मत प्रा. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे.

‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथात ते लिहितात, “सावरकरांनी टिळकप्रणीत हिंदू लक्षण विद्यमान असताना हिंदुत्वाची नव्याने व्याख्या करण्याचा जो घाट घातला, तो एका अर्थाने आगरकरांनी निर्दिष्ट करून अलक्षित ठेवलेल्या मूळ प्रकृतीच्या, भारतीय आर्यत्वाच्याच लक्षणाचा प्रयत्न होता.” (४-४८४)

अलीकडील काळात एक प्रश्न नेहमी चर्चिला जाऊ लागला आहे; तो म्हणजे हिंदुत्ववादी मनुष्य बुद्धिवादी असू शकतो काय किंवा बुद्धिवादी मनुष्य हिंदुत्ववादी असू शकतो काय? दोन उदाहरणे आपल्या समोर आहेत. ज्यांनी महाराष्ट्रात बुद्धिवादाची पहिली ध्वजा उभारली, त्या आगरकरांनीच आर्यत्व किंवा हिंदुत्वाचा आग्रह धरला आहे.

 

SAVARKAR AGARKAR POSTMAN
ThePostman

त्यानंतर त्यांचे शिष्य म्हणवून घेणाऱ्या सावरकरांनी स्वतंत्रपणे चिंतन करून ‘हिंदूराष्ट्रदर्शन’ निर्माण केले. त्यांच्या हिंदुत्वामुळे त्यांचा बुद्धिवादावर शंका घेतली जाते. बुद्धिवादी हा हिंदुत्वनिष्ठ असूच शकत नाही या ठाम गैरसमजामुळे आगरकरांचीही हिंदुत्वनिष्ठ बाजू प्रकाशात आली नाही.

===

संदर्भ सूचना–

येथे संदर्भासाठी दोन अंकांची योजना करण्यात आली आहे. त्यातील पहिला अंक ग्रंथसूचीतील ग्रंथक्रमांक आहे, तर दुसरा त्यातील पृष्ठांक आहे.

१. आगरकर वाङ्मय खंड – १, संपादक देशपांडे व नातू.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई (१९८५)

२. आगरकर वाङ्मय खंड – २, संपादक देशपांडे व नातू.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई (१९८५)

३. आगरकर – य. दि. फडके, मौज प्रकाशन (१९९६)

४. तुकाराम दर्शन – सदानंद मोरे, गाज प्रकाशन, अहमदनगर (१९९६)

५. सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास – शेषराव मोरे, अभय प्रकाशन, नांदेड, (१९९२)
हिंदुत्व – वि. दा. सावरकर – मनोरमा प्रकाशन २००२

(सदर लेख २००५ साली परममित्र दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आला आहे.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!