आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एखाद्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्याला भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? असे विचारल्यास तो निश्चितपणे “क्रिकेट” ठोकून देईल. पुलंच्या म्हणण्यानुसार “मुंबईतील चाळींच्या गॅलरीत टेस्ट मॅचेस चालतात” हे काही फक्त मुंबईपर्यंत सीमित राहिले नसून आता ते पूर्ण भारतात लागू होतं. वाहतुकीसाठी तयार केलेला रस्ता, घरांचे आणि इमारतींचे टेरेस, डोंगराळ भाग, इमारतींचे व्हरांडे, शाळा-कॉलेजचे वर्ग अशा सगळ्या शक्य ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस चालतात.
काही ठिकाणी तर क्रिकेट खेळण्याचा विषय राहत नसून तो बोलण्याचा आणि चर्चेचा विषय होतो. सर्वसमावेशक असं काही असेल ते म्हणजे क्रिकेट, म्हणूनच की काय, काश्मीरमध्ये शांतता नांदण्यासाठी आणि तिथल्या युवांच्या क्षमतांना अजमावण्यासाठी काश्मीरमध्ये दर वर्षी भारतीय सेना क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करते.
हॉकी हा जरी आपला राष्ट्रीय खेळ असला तरी भारतीयांच्या मनात घर करून बसलंय ते म्हणजे ‘क्रिकेटच’! राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे क्रिकेटचे सामने हे एखाद्या उत्सवासारखे साजरे केले जातात आणि यामुळेच क्रिकेट हा फक्त खेळ राहिला नसून अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक होऊन बसलाय.
आपण क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळाडूंचे वेगवेगळ्या प्रकारचे अबालवृद्ध चाहते पहिले असतील. आपल्या संघाला चीअर करण्यासाठी कोणी आपला चेहरा रंगवतं, तर कोणी संपूर्ण शरीरच रंगवून येतं, वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या, टीशर्ट्स, मनोरंजक मजकूर असलेले फलक, स्टेडियम जवळच्या पर्वतावरून भारतीय टीमला चिअर साठी दाखवलेला तिरंगा असे आणि या पेक्षा कित्येक वेगवेगळे चाहते आपण पाहतो.
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आय.पी.एल. म्हणजे तर क्रिकेट फॅन्ससाठी पर्वणी असते, जगाच्या वेगवेगळ्या भागातून अनेक खेळाडू आय.पी.एल. खेळण्यासाठी भारतात येतात, त्यांच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो आणि तसाच पैसा खर्च करून आय.पी.एल.चं आयोजन करण्यात येतं.
मागच्या काही वर्षात काही मोजक्याच संघांच्या मॅचेस आय.पी.एल. मध्ये बहुचर्चित ठरल्या. या मध्ये प्रामुख्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा संघ होता. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारखे दिग्गज खेळाडू या संघात असूनही वारंवार या संघाला पराभवाला समोर जावं लागत असे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे पूर्ण देशात अनेक चाहते आहेत, काही विराट कोहली मुळे, तर काही एबी डिव्हिलियर्स मुळे. कारण काहीही असो, पण चाहत्यांनी या संघावर जीवापाड प्रेम केलेलं आपल्याला अनेक मॅचेसच्या वेळेला दिसून येईल.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या एका फॅनने तर अजब आणि अकल्पनीय काम केलंय! त्याने बंगलोर मधील राजेंद्र नगर येथील एका बेनामी रस्त्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सचं नाव देऊन टाकलं. हातात कोणतीही सरकारी नोकरी नसताना, कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसताना आणि रस्त्यांच्या नावाबद्दल निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नसताना या महाशयांनी हा पराक्रम कसा केला असेल?
आपण कोणत्याही अनोळखी ठिकाणावर रस्ता चुकल्यावर काय करतो? खिशातील स्मार्ट-डब्यावर गुगल मॅप चालू करून आपला पुढचा प्रवास सुखकर करून घेतो. गुगल मॅप्सवर एका विशिष्ट लेव्हलला पोहोचल्यावर आपल्याला मॅप अपडेट करता येतो, म्हणजे एखाद्या इमारतीच्या अथवा रस्त्याच्या नावातील बदल, एखादी इमारत प्रत्यक्षात त्या ठिकाणी नसली तरी मॅपवर दाखवली जात आहे असे दिसल्यास आवश्यक ते बदल आपल्याला करता येतात.
याच गोष्टीचा वापर करून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या एका चाहत्याने कर्नाटकातील बंगलोरमधील राजेंद्र नगर जवळील एका रस्त्याचे नाव एबी डिव्हिलियर्स रोड असे करून टाकले. सरकारकडून अधिकृतपणे या रस्त्याला एबी डिव्हिलियर्सचे नाव देण्यात आलेले नाही, परंतु एका चाहत्याला फ्रेंचायझीसाठी वर्षानुवर्षे डिव्हिलियर्सने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक दाखवायचे होते.
एबी डिव्हिलियर्स निःसंशयपणे सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. वय वर्ष 40 असूनही तो अजूनही मजबूत आहे आणि त्याच्या खेळाच्या शीर्षस्थानी आहे. बेंगळुरूमध्ये त्याची मोठी लोकप्रियता आहे आणि साऊथ आफ्रिकेचा सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज (विकेट-किपर बॅट्समन) एबी डिव्हिलियर्स २०११ पासून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळतो.
त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई येथे पहिल्या सामन्यात अवघड धावसंख्येचा पाठलाग करण्यास मदत केली आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध संघासाठी विजयी धावसंख्या उभारण्यासाठी 34 चेंडूत 76 धावा फटकावल्या. डिव्हिलियर्स त्याच्या गुणतालिकेत भर घालण्यास नक्कीच उत्सुक असेल कारण वानखेडेवर आरसीबीने सीएसकेचा सामना केला. आणि यात दोन्ही संघाचं टेबल मधील स्थान निश्चित होणार होतं.
मिस्टर 360 ने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी अनेक सामने खेळले आहेत. तो फ्रँचायझीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा कॅप्ड खेळाडू आहे आणि प्रत्येक मेगा-ऑक्शनपूर्वी फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.