ज्या शास्त्रज्ञाने पाकिस्तानला न्युक्लीअर पॉवर बनवलं तो आज आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


गेल्या भागात आपण वाचलं की कसं शिताफीने खानने हॉलंड आणि जर्मनीमधून माहिती चोरून आणून, त्या माहितीवर आधारित तंत्रज्ञान पाकिस्तानात विकसित केलं. आता पुढे.

एवढं सगळं करूनसुद्धा खानला हवा तेवढा मान पाकिस्तानात मिळत नव्हता, कारण अधिकृतरित्या अजूनही मुनीरच PAEC पाकिस्तानी ऍटोमिक एनर्जी कमिशनचा अध्यक्ष होता आणि खान ज्या प्रकल्पावर काम करत होता तो अजूनही गोपनीयच होता.

खान किती जरी देशभक्त असला, तरी त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू होता, जो कायम त्याला अहंकारी बनवायचा. “मी, माझं आणि माझ्यामुळे” या गोष्टी खानच्या बोलण्यातून कायम जाणवायच्या. त्यामुळे आपण केलेल्या कामाचं आपल्याला श्रेय मिळत नाहीये हे खानला अजिबात पटत नव्हतं. त्यामुळेच मुनीरबद्दल कायम त्याच्या मनात मत्सर असायचा. एवढंच काय आपला प्रकल्प गोपनीय आहे हे त्याला कायम खटकायचं, पण त्यावर काहीच उपाय नव्हता. आपल्या कामाबद्दल तो कुठेच बोलू शकत नव्हता. त्यामुळे मुनीर सगळं श्रेय घेऊन जात होता.

खान आता मुनीरचा तिरस्कार करायला लागला. त्यात भर म्हणून की काय PAEC अजूनही प्लुटोनियम प्रणालीवर काम करत होती आणि आता तर ते अणुबॉम्ब डागण्याच्या क्षेपणास्त्रावरसुद्धा काम करायला लागले होते. जर या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे पूर्ण झाल्या तर मग खान आणि खानच्या कहुता प्रकल्पाला काहीच किंमत राहिली नसती.

खानने आता सार्वजनिक माध्यमांचा वापर करून घेण्यास सुरुवात केली. त्याने ‘मुनीर हा किती नीच मनुष्य आहे’ अशा बातम्या वर्तमानपत्रात द्यायला सुरुवात केली. मुनीरबद्दल कोणीच चांगलं बोलत नव्हतं एवढंच काय फ्रेंच अँटॉमीक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष Goldschmidt यांनी सुद्धा “मुनीर अतिशय बेभरवशाचा माणूस आहे. त्याच्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही” असं वक्तव्य केलं. खानचा अहंकार आता दिवसेंदिवस वाढत होता.

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि तो मी विकसित केलाय‘ हे गुपित ठेवणं त्याला आता जड जायला लागलं. त्याला आता श्रेय हवं होतं, त्याला लोकप्रियता हवी होती.

नेमकं याच वेळी भारतातून एक पत्रकार त्याच्या एका मित्राच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी इस्लामबादला आला होता. त्या पत्रकाराचं नाव होत “कुलदीप नय्यर“. 27 जानेवारी, 1987 रोजी आपला खास मित्र, ‘मुस्लिम’चा संपादक ‘मुशाहीद हुसेन’ याच्या लग्नासाठी ते पाकिस्तानला आले होते. इस्लामाबाद एअरपोर्टवर स्वतः हुसेन त्यांना घ्यायला आला होता. त्यांना भेटताच हुसेन म्हणला, “मी तुझ्यासाठी खास भेट आयोजित केलीये.” ती भेट ए क्यू खानसोबत असेल, याची थोडी सुद्धा कल्पना नय्यर यांना नव्हती. ही भेट खानसोबत आहे हे कळताच नय्यर यांना खूप आनंद झाला, कारण बऱ्याच वर्षांपासून ते खान यांच्या कामाची माहिती गोळा करत होते. आज प्रत्यक्षात त्यांना भेटायचा योग येतोय म्हणाल्यावर नय्यर खूप खुश झाले.

संध्याकाळी 6 वाजता खानच्या घरीच मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं. खानचं घर हे इस्लामाबाद शहराच्या अगदी बाजूलाच होत. खान हा महत्वाचा माणूस होता, त्यामुळे त्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरपूर सुरक्षा होती. काही दिवसांपूर्वी याच सुरक्षारक्षकांनी एका फ्रेंच पत्रकाराला मारहाण केली होती, त्यामुळे नय्यर जरा दबकूनच होते. नय्यर यांना मात्र कोणीच अडवलं नाही, कारण हुसेनने आधीच सगळं नियोजन केलं होतं.

खानच्या घरासमोर मात्र एवढा पहारा नव्हता. ना तिथं उंच प्रवेशद्वार होतं, ना कोणती स्वयंचलित यंत्रे होती. नय्यर यांच्या स्वागतासाठी खान व्हरांड्यातच उभा होता. नय्यरला भेटताच खानने त्यांचं कौतुक सुरू केलं ” मी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे, तुमचे लेख मी कायम वाचत असतो.” एवढं बोलून खान नय्यर आणि हुसेनला घेऊन बैठकीच्या खोलीत गेला. नय्यर यांना माहिती होतं की खान हा अहंकारी माणूस आहे, त्याला कौतुक जेवढं आवडतं तेवढाच त्रास त्याला त्याच्या अहंकाराला कोणी डिवचले होतो.

जेव्हा नय्यर यांनी सांगितलं की ते इथे खान यांच्या शैक्षणिक यशाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल आणि वैज्ञानिक शोधाबद्दल जाणून घ्यायला आलेत, तेव्हा अर्थातच खानला छान वाटलं. खानने त्याचं कौतुक करणारा “हुरीयत” या मासिकामधील लेख नय्यर यांना वाचायला दिला. या सर्व मुलाखतीत फक्त एक अट नय्यर यांना घालण्यात आली होती, ती म्हणजे कुठलंही संभाषण त्यांनी रेकॉर्ड करायचं नाही आणि कुठलंही खान यांच वक्तव्य त्यांनी लिहून नाही घ्यायचं. या सगळ्या मुलाखतीत नय्यर यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत हाती ती म्हणजे खानचा “मीपणा.”

जेव्हा जेव्हा नय्यर खानची स्तुती करत तेव्हा तेव्हा खानच्या तोंडावर चमक येत असत. असंच कौतुक करता करता नय्यर यांनी एका वाक्यात खानला बरोबर हरभऱ्याच्या झाडावर चढवले.

नय्यर खानला म्हणाले “भारतीय उपखंडातील तुम्ही एकमेव शास्त्रज्ञ आहात ज्यांनी भौतिकशास्त्र तसेच धातुशास्त्र या दोनही विषयांत डॉक्टरेट मिळवली आहे.” हे वाक्य ऐकल्यावर तर खानच्या खुशीचा पारावार राहिला नाही.

आता खान मोकळेपणाने नय्यर यांना उत्तरे देऊ लागला होता. पण अजूनही नय्यर यांना खानकडून जे हवंय ते मिळत नव्हतं. ‘पाकिस्तानने बॉम्ब बनवलाय की नाही?’ याचं उत्तर नय्यर यांना खानकडून काढून घ्यायचं होतं. त्यांनी सगळे हात वापरून पाहिले पण खान काही बोलेना. शेवटी त्यांनी खानचा अहंकारच खानच्या विरोधात वापरायचा ठरवला. त्यांनी सरळ खानच्या अहंकाराला आवाहन दिलं. त्यांनी खानला मनानेच एक गोष्ट रचून सांगितली.

नय्यर म्हणाले “पाकिस्तानला यायच्या आधी मी दिल्लीला गेलो होतो. तिथे माझी भेट ‘डॉ. सेठना’ सोबत झाली, ज्यांनी भारतीय अणुबॉम्ब बनवले आहेत. त्यांनी मला सरळ सरळ सल्ला दिला की पाकिस्तानात जाऊन तुझा वेळ वाया जाईल कारण पाकिस्तान बॉम्ब बनवूच नाही शकत, ना त्यांच्याकडे त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आहे आणि ना तेवढी हुशार माणसं.”

बस… हे ऐकताच खानाचा पारा चढला. त्याच्या अहंकाराला आता चांगलीच ठेच पोहोचली होती. खान जवळजवळ ओरडलाच, “सांग त्यांना जाऊन आमच्याकडे आहे म्हणा बॉम्ब आणि जर भारताने पुन्हा आमच्यावर हल्ला केला तर आम्ही बॉम्ब वापरायला अजिबात मागे पुढे पाहणार नाही.”

हुसेन आता पुरता गडबडला होता त्याला कळतचं नव्हतं नेमकं काय चाललंय. अर्ध्या तास चाललेल्या मुलाखतीत खानने बरीच महिती दिली होती. मुलाखत संपल्यावर हुसेन आणि नय्यर पुन्हा माघारी निघाले. ना राहवून शेवटी घाबरलेल्या आवाजात हुसेनने नय्यर यांना विचारलंच “खानने तर सगळं सांगितलंय, आता तू काय छापणारेस यावर माझं या देशात राहणं अवलंबून आहे. कुलदीप माझी एकच विनंती आहे, हे लिहिशील त्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तुझा मित्र पाकिस्तानात राहतोय आणि त्याचं आयुष्य त्यावर अवलंबून आहे.”

नय्यर यांनी हुसेनला वचन दिलं आणि पाळलंही. त्यांनी त्यावर काही महिने काहीच नाही छापलं. पण अशी शक्यता आहे की त्यांनी ही माहिती भारतीय सरकारला लगेच दिली. त्यामुळेच 1987 साली पाकिस्तानी सीमेवर युद्धासाठी तैनात केलेलं सैन्य तडकाफडकी राजीव गांधी यांच्या आदेशानुसार मागे घेण्यात आलं.

ज्यावेळी नय्यर यांनी या विषयावर छापून आणलं, त्यावेळी नेहमीप्रमाणे खानने या सगळ्या गोष्टी धुडकावून लावल्या आणि सांगितलं की ही सगळी भारताची चाल आहे. पण यात असाही तर्क लावला जातो की भारताला पाकिस्ताकडे बॉम्ब आहे ही खबर खुद्द पाकिस्तानचे अध्यक्ष झिया उल हक यांनीच दिली होती.

हा झाला तर्कवितर्काचा मुद्दा. पण हा बॉम्ब पाकिस्तानने तयार केला होता आणि त्याचं सगळं श्रेय खानला जातं यात काहीच दुमत नाही. 28 मे, 1998 रोजी जेव्हा पाकिस्तानने अणुबॉम्ब चाचणी घेतली तेव्हा तर खान हा पाकिस्तानचा हिरो झाला होता. खान आता फक्त शास्त्रज्ञ नाही, तर पाकिस्तानचा जननायक झाला होता.

एवढं सगळं असतानासुद्धा 2004 साली त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत का ठेवण्यात आलं?

तर झालं असं होतं, खानाला पहिल्यापासूनच पाश्चिमात्य देशांबद्दल खूप राग होता. ‘स्वतः अणुबॉम्ब तयार केल्यानंतर आज ते बाकी कोणाला अणुबॉम्ब तयार करू देत नाहीयेत. हा कुठला न्याय?’ त्यामुळे खानाने बाकी मुस्लिम राष्ट्रांमध्ये आपली प्रणाली विकायला सुरू केली. ‘मुस्लिम राष्ट्रांना अणुबॉम्ब बनवून देण्यात गैर काहीच नाही,’ हे त्याचं पहिलं उद्दिष्ट होतं. त्यामुळे ज्या दिवसापासून त्याने पाकिस्तानी अणुबॉम्ब तयार करायला सुरुवात केली, त्याच दिवसांपासून त्याने स्वतःचे वेगळे संपर्कजाळे तयार करायलासुद्धा सुरुवात केली.

पाकिस्तानी अणुबॉम्बसाठी जे काही साहित्य लागत होतं ते बाहेरच्या देशांतून मागवताना ते दुप्पट मागवून घ्यायचे आणि जास्तीचं साहित्य दुसऱ्या देशांना विकायचे. खान याचं दुसरं उद्दिष्ट होतं अर्थातच पैसा. “सेंट्रीफ्युज तंत्रज्ञानामध्ये” खान अतिशय पारंगत झाला होता. त्यामुळे हे तंत्रज्ञान स्वतःच्या मालकीचं आहे असाच त्याचा समज होता.

या अहंकारी वृत्तीमुळेच त्याने हे अणुबॉम्ब विकसित करण्याचं तंत्रज्ञान उत्तर कोरिया, लिबिया आणि इराण या 3 देशांना विकलं. पण “अति तिथे माती” असते. खानाने तयार केलेलं हे संपर्काचे जाळे अमेरिकेच्या रडारवर आले आणि 2004 साली खानाला रंगेहाथ पकडण्यात आलं आणि त्याच्या इस्लामबादच्याच घरात कैद करण्यात आलं.

पाकिस्तानचा हिरो म्हणून गौरवण्यात आलेला शास्त्रज्ञ आज एक जागतिक गुन्हेगार झाला होता. 2006 साली खानाला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झालं. कर्करोगामुळे 2006 साली पाकिस्तानी सरकारने त्याची सुटका केली. खान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच होता, पण एक माणूस आणि पती म्हणून तो कायम चांगला होता. आजही तो पाकिस्तानमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कार्यशाळा घेतो. मध्यंतरी कराची विद्यापीठात झालेल्या कार्यशाळेत त्याने विद्यार्थ्यांना संबोधून भाषण केले.

त्यात त्याने खूप महत्वाचा मुद्दा मांडला “फक्त पदवी घेण्यासाठी नाही तर स्वतःच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी शिका. पैसे देऊन फक्त पदवी मिळवता येते, ज्ञान मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.”

त्याने जे काही केलं होतं ते निव्वळ देशप्रेमापोटीच केलं होतं. नंतर त्याने ज्या ज्या देशांना प्रणाली विकली ती त्याने फक्त पाश्चिमात्य देशांची मुजोरी मोडीत काढण्यासाठीच विकली होती. त्याचे विचार कदाचित बरोबर होते पण मार्ग नक्कीच चुकीचा होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!