आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा आणि समाज प्रबोधनाचा इतिहास मोठा आहे. एकूण इतिहासापैकी अत्यल्प भाग आपल्याला शाळा आणि महाविद्यालयात शिकवला जातो. ज्ञात क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासापैकीच काही भाग आपल्याला शिकवला जात असेल तर असे कित्येक अज्ञात आणि दुर्लक्षित स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक असेही आहेत, ज्यांची नावेसुद्धा आपल्याला माहित नाहीत. आजचं युग ‘मोटिव्हेशन’चं आहे. कित्येक महागडे ‘मोटिव्हेशनल स्पिकर्स’ कॉलेजेस आणि कॉर्पोरेट क्षेत्रात जाऊन भाषणे करतात. परंतु आपण इतकेच प्रयत्न आपल्या क्रांतिकारांना आणि अन्य कर्तृत्ववान लोकांना जाणून घ्यायला केले असते तर अशा तथाकथित ‘मोटिव्हेशनल स्पिकर्स’ची गरजच नसती पडली.
साधारणतः इसवी सनाच्या २००० मध्ये आणि त्यानंतर जन्मलेल्या मुलांचा बुद्ध्यांक सतत कमी होत आहे असे कैक सर्वेक्षणांमधून समोर आले आहे. यालाच शास्त्रीय भाषेत ‘फ्लीन इफेक्ट’ असेही म्हणतात. मागच्या शेकडो वर्षांपासून तरुणांचा बुद्ध्यांक सतत वाढत होता, पण मागील २० ते २५ वर्षांत तो अचानक कमी होऊ लागला आहे. हीच मुळी धोक्याची घंटा आहे.
मानसशास्त्रीय दृष्टीने पहिले तर किशोरवयीन मुला-मुलींना आपल्यासमोर सतत एक आदर्श ठेवायला आवडतो. किंबहुना ते वय आणि मानसिक स्थितीच अशी असते, ज्यामध्ये एखादा आदर्श तरुणांच्या समोर असतोच. पण आजच्या काळात वाढलेल्या सोशल मीडियाच्या वापरामुळे आणि अन्य माध्यमांमुळे हे चुकीचे ‘आदर्श’ त्यांच्यासमोर उभे राहात आहेत हे दिसून आले आहे.
‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स’च्या नावाखाली आपल्याला माहित नसलेली गोष्ट किंवा टवाळखोरी इत्यादी गोष्टी ‘आपल्यला सगळं माहित आहे’ या अविर्भावात काहीशा तथाकथित ‘पॉश’ आउटफिटमध्ये तरुणांसमोर ठेवल्या जातात. जर याने लाईक्स किंवा रिच वाढली नाही तर अत्यन्त नीच दर्जाचे शब्दप्रयोग करूनही हे ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स’ तरुणांवर आपला प्रभाव पाडतात.
त्या प्रभावामुळे माणूस एका कल्पनिक जगात वावरू लागतो. त्याच काल्पनिक विश्वात तो अनेक स्वप्नं उभी करतो, मग ही स्वप्नं जीवनाच्या कठोर रणांगणावर साकार होतीलच असे नाही. किंबहुना असे राईचे पर्वत, ‘पायाविना असलेली भिंत कोसळावी’ तसे अलगद कोसळतात. मग यातून नैराश्य, दुःख यांसारख्या समस्यांचा उदय होतो.
जर माणूस अतिशय संवेदनशील असेल तर मात्र निराशेवर आणि रडत बसण्यावर भागत नाही, मग आत्मह*त्येचा विचार डोक्यात येऊन तशीच कृती होते. अनेकांना ‘डिप्रेशन’सारखे वेगवेगळे मानसिक रोग होतात. भारत आज जगातील सर्वात तरुण देश असूनही ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये अन्य देशांच्या मानाने कमी पदक मिळवतो, त्यालाही कदाचित हेच कारण असावे.
आपल्यापैकी प्रत्येकाला शेकडो ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स’ माहित असतील, पण आपल्यापैकी किती जणांना पांडुरंग खानकोजे, वीर भाई कोतवाल, विष्णू पिंगळे, अनंत कान्हेरे, खुदिराम बोस, सूर्य सेन, निर्मल सेन, बादल गुप्ता, दिनेश गुप्ता, बिनोय बसु, यतींद्रनाथ दास, बिना दास, कल्पना दत्त, कनकलता बरुआ, शांती घोष, सुनीती चौधरी, प्रीतीलता वड्डेदार, शिरीष कुमार आणि अशा काही किशोरवयीन स्वातंत्र्यसैनिकांची नावे माहिती आहेत? यांमधील कित्येकांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठ्या प्रमाणात सशस्त्र कारवाया केल्या होत्या, तेसुद्धा अवघ्या १८ ते २५ या वयांत.
जर आपली प्रेरणास्थानं असे क्रांतिकारक नाहीत तर नेमके कोण आहेत हे तपासून पाहायला हवं. जर असेच क्रांतिकारक आणि कर्तृत्ववान लोक तरुण पिढीचे ‘इन्स्पिरेशन्स’ असते तर डिप्रेशनसारख्या केसेस काही प्रमाणात तरी कमी असत्या! अशाच एका खऱ्याखुऱ्या मोटिव्हेशनल स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आज जाणून घेणार आहोत.
ब्रिटिशांच्या काळातील संस्थानांमधील एखादा राजा/महाराजा म्हटलं की अनेकांसमोर ऐषारामात जीवनव्यापन करणारा, रेस कोर्समध्ये घोड्यांवर पैसे लावणारा, जनतेवर अन्याय करणारा आणि एकूणच व्हीलनची भूमिका घेतलेला दुष्ट राजा असतो. भारतातील बहुतांश राजे असे असले तरीही बरेच जण सयाजीराजे गायकवाड, राजर्षि शाहू महाराज, महाराणी सेतू लक्ष्मीबाई, इत्यादींसारखे लोकहितासाठी आणि स्वातंत्र्यासाठी झटणारेही होते.
राजा महेंद्र प्रताप सिंह हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नावाने अलीगढमध्ये एक स्टेट युनिव्हर्सिटी (राज्यस्तरीय विश्वविद्यालय) निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विद्यापीठाची पायाभरणी केली, यामुळे हे विद्यापीठ प्रचंड चर्चेत होते आणि त्यासोबतच अनेकांना राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्याबद्दल कुतुहूल आहे.
राजा महेंद्र प्रताप सिंह हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात मोठे स्थान मिळवले आहे. स्वातंत्र्यसैनिकाबरोबरच ते पत्रकार आणि लेखकही होते. त्यांचे योगदान पाहून भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केले होते. पहिल्या महायु*द्धाच्या वेळी ते भारतीय निर्वासित आणि हंगामी सरकारचे अध्यक्ष होते. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी समाजसुधारक म्हणून काम केले.
राजा महेंद्र प्रताप सिंह यांचा जन्म १ डिसेंबर १८८६ रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील ‘मुरसान जमीनदार इस्टेट’च्या एका शाही जाट कुटुंबात झाला. राजा घनश्याम सिंह यांचे ते तिसरे अपत्य होते. त्यांनी अलीगढच्या एका सरकारी शाळेत अभ्यासाला सुरुवात केली, पण लवकरच त्यांना ‘मुहम्मदन अँग्लो ओरिएंटर कॉलेजिएट स्कूल’ येथे प्रवेश मिळाला. याच विद्यापीठाला आज ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठ’ म्हणूनही ओळखले जाते. मुहम्मदन अँग्लो ओरिएंटर कॉलेजिएट स्कूल येथे त्यांना विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांचे मार्गदर्शन लाभले.
१९०५ साली त्यांनी मुहम्मदन अँग्लो ओरिएंटर कॉलेजिएट स्कूल सोडले पण त्यांचे शिक्षणप्रेम कायम राहिले. युरोपियन देशांमध्ये झालेल्या सर्वसमावेशक प्रगतीच्या स्तरावर भारताला आणण्याच्या दृष्टीने त्यांनी १९०९ साली आपल्या वृंदावन किल्ल्यात ‘प्रेम महाविद्यालया’ची स्थापना केली जी ‘स्वतंत्र स्वदेशी तांत्रिक संस्था’ म्हणून प्रसिद्ध झाली आहे.
राजा महेंद्र प्रताप सिंह यांचा विवाह हरियाणातील जिंद येथील शाही सिंध कुटुंबातील बलवीर कौर यांच्याशी झाला होता. त्यांच्या सासऱ्यांच्या आक्षेपाला न जुमानता, राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी कोलकाता येथे १९०६ साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला हजेरी लावली होती. ते अनेक स्वदेशी आंदोलकांना भेटले. यानंतरच त्यांनी स्वदेशी उत्पादन वाढवण्यासाठी स्थानिक कारागीर आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.
ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी वयाच्या २८व्या वर्षी देश सोडला, जेणेकरून त्यांना देशाबाहेरूनही पाठिंबा मिळू शकेल. या दरम्यान ते वीरेंद्र चट्टोपाध्याय, लाला हरदयाल यांसारख्या क्रांतिकारकांनासुद्धा भेटले. वीरेंद्र चट्टोपाध्याय यांच्या माध्यमातून राजा महेंद्र प्रताप सिंह जर्मन सम्राटाला भेटले. जर्मनीमध्ये त्यांनी लष्करी धोरणांचे बारकावे शिकले. त्यांची अफगाणिस्तानमार्गे ब्रिटिश सत्तेवर जोरदार ह*ल्ला करण्याची योजनाही होती.
सुमारे २००० सैनिकांसह १ डिसेंबर १९१५ रोजी जपानहून काबूलला पोहोचल्यानंतर राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी भारताचे पहिले निर्वासित सरकार (गव्हर्नमेंट-इन-एक्झाइल) स्थापन केले. राजा महेंद्र प्रताप सिंह स्वतः या सरकारचे अध्यक्ष झाले आणि मौलवी बरकतुल्लाह यांना पंतप्रधान म्हणून तर मौलवी उबैदुल्ला सिंधी यांना गृहमंत्री म्हणून नियुक्त केले. क्रांतिकारक या नात्याने ते लेनिनच्या जवळचे होते.
दरम्यान, ब्रिटिशांनी त्यांच्यावर मोठे बक्षीस ठेवून त्यांना फरार घोषित केले होते, त्यामुळे त्यांना जपानला जावे लागले. भारताला मुक्त करण्याच्या दृष्टीने जागतिक यु*द्धग्रस्त परिस्थितीचा वापर करायचा असे त्यांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी जपानमध्ये १९२९ साली ‘वर्ल्ड फेडरेशन मंथली मॅगझीन’ प्रकाशित केले. १९३२ साली त्यांचे नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकन देखील झाले.
दुसऱ्या महायु*द्धादरम्यान ते जपानमधील टोकियो येथे राहिले आणि भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करण्यासाठी ‘वर्ल्ड फेडरेशन सेंटरमधून त्यांची चळवळ चालू ठेवली. दुसऱ्या महायु*द्धादरम्यान त्यांनी १९४० साली जपानमध्ये भारताचे कार्यकारी मंडळ स्थापन केले.
शेवटी ब्रिटिश सरकारने हार मानली आणि राजा महेंद्र प्रताप सिंह यांना आदराने टोकियोहून भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. ब्रिटिशांनी एखाद्या भारतीय क्रांतिकारकाला आदर दिला याचे हे एकमेव उदाहरण असेल. ते तब्बल ३२ वर्षांनी भारतात परतले. ते ९ ऑगस्ट १९४६ रोजी मद्रास येथे उतरले. भारतात पोहोचल्यावर त्यांनी महात्मा गांधींना भेटण्यासाठी लगेच वर्धा येथे धाव घेतली.
स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी सामान्य माणसाच्या हक्कांसाठी भ्रष्टाचार आणि नोकरशाहीविरुद्ध लढा दिला. महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी पंचायत राज व्यवस्थेला पाठिंबा दिला. पंचायत राज हे एकमेव साधन आहे जे लोकांच्या हातात खरी शक्ती देऊ शकते आणि भ्रष्टाचार आणि नोकरशाहीचे अडथळे कमी करू शकते असा त्यांचा विचार होता. ते भारतीय स्वातंत्र्य सेनानी संघटना आणि अखिल भारतीय जाट महासभेचे अध्यक्ष होते.
१९५७ ते १९६२ मध्ये ते दुसऱ्या लोकसभेचे सदस्य होते. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत मथुरा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भारतीय जन संघाचे उमेदवार आणि भारताचे भावी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पराभूत केले. राजा महेंद्र प्रताप सिंह स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडले गेले. त्यावेळी अटलजींसारखा प्रभावी नेतासुद्धा चौथ्या स्थानावर होता.
१९३२ साली त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यांचे नामांकित एन.ए. निल्सन त्यांच्याविषयी सांगतात, “प्रतापने शैक्षणिक प्रचारासाठी आपली मालमत्ता सोडली आणि वृंदावन येथे एक तांत्रिक महाविद्यालय स्थापन केले. १९१३ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील गांधींच्या मोहिमेत भाग घेतला. अफगाणिस्तान आणि भारतातील परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. १९२५ साली तिबेटला जाऊन त्यांनी दलाई लामांची भेट घेतली. ते प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या वतीने अनधिकृत आर्थिक मोहिमेवर होते, पण त्यांना भारतातील ब्रिटीशांच्या क्रूरतेचा पर्दाफाश करायचा होता. त्यांनी स्वतःला शक्तीहीन आणि कमकुवत सेवक म्हणवून घेतले. “
अशा या प्रचंड सामर्थ्यवान क्रांतिकारकाबद्दल भारतीय इतिहासाच्या पुस्तकांत अतिशय कमी पाने आहेत, हेच दुर्दैव!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.