आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ऑलिम्पिक म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो. तो उत्साह आपण याच वर्षी मागच्या आणि या महिन्यात पॅरिस येथे अनुभवला. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे जागतिक क्रीडा सामने अनेक देशांमध्ये प्रत्येकी चार वर्षांच्या अंतराने भरवले जातात. मागच्या वर्षी उत्तर प्रदेश सरकारने ऑलिम्पिक सामन्यांसाठी ग्रेटर नोएडा येथे एक स्वतंत्र शहर तयार करण्याचा निर्णय घेतला असून ते शहर अनेक स्पोर्टींग फॅसिलिटीजसह विविध सुखसुविधांनी सज्ज असेल. या ऑलिम्पिकला मोठा इतिहास असून यात काही गमतीदार किस्सेही घडले आहेत. अशाच एका घटनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
सुमारे शतकभरापूर्वीची गोष्ट. १९२० साली बेल्जीयम येथील अँटवर्पमध्ये ऑलिम्पिकचे सामने रंगले होते. या ऑलिम्पिक सामन्यांमध्ये सर्वप्रथम ऑलिम्पिकचा ध्वज फडकवण्यात आला. ऑलिम्पिक सामन्यांचा ध्वज हा वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात वैश्विक एकतेचा संदेश दिलेला आहे. ऑलिम्पिकच्या ध्वजावरील एकमेकांत गुंफलेली ५ वर्तुळे ५ मुख्य खंडांचे प्रतिनिधित्व करतात – युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही अमेरिकन खंड.
१९२० साली ऑलिम्पिक सामने पार पडल्यानंतर मात्र एक विचित्र घटना घडली, ती म्हणजे या वर्षीच पहिल्यांदा अनावरण केलेला ऑलीम्पिकचा ध्वज अचानक हरवला. पहिल्यांदाच अनावरण केल्याने हा ऐतिहासिक ध्वज तर होताच पण ओरिजिनल ऑलीम्पिक फ्लॅगही होता. पण हा अतिशय मौल्यवान ध्वज शेवटपर्यंत सापडलाच नाही. त्यानंतर क्वचितच कोणी या ध्वजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असावा.
१९९७ साली अमेरिकेत युनायटेड स्टेट्स ऑलिम्पिक कमिटी बँक्वेटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अमेरिकेतील अनेक दिग्गज खेळाडूंसह अनेक मान्यवर आणि पत्रकारही उपस्थित होते. त्यांच्यामध्ये एक होते हाल प्रिस्ट. हाल प्रिस्ट सर्वांत ज्येष्ठ आणि आजही हयात असलेले ऑलिम्पियन म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांचे वय होते ९७.
याच कार्यक्रमात एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. साहजिकच या मुलाखतीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेल्या पहिल्या ऑलिम्पिक सामन्यांची चर्चा झाली. पत्रकाराने हाल प्रिस्ट यांना ऑलिम्पिकच्या पहिल्या, मूळ ध्वजाबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले, “मी तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतो. तो (ध्वज) माझ्या सुटकेसमध्ये आहे..!” आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
१९२० साली बेल्जीयममधील अँटवर्प येथे झालेल्या सामन्यात हाल यांनी सहभाग नोंदवला होता. याच सामन्यामध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. या ऑलिम्पिकमध्ये हाल प्रिस्ट अमेरिकेच्या संघाकडून डायव्हिंगसाठी सहभागी झाले होते. त्यांनी प्लॅटफॉर्म डायव्हिंग या प्रकारात कांस्य (ब्रॉन्झ) पदक मिळवले होते. सामने संपल्यानंतर त्यांच्याच टीमचा भाग असलेले ड्यूक कहानामोकु यांनी त्यांना ऑलिम्पिकच्या ध्वज चोरण्याचे डेअर दिले होते.
हार न मानणाऱ्या प्रिस्टने ते डेअर घेतले आणि सुमारे १५ फूट उंच असलेल्या ध्वजस्तंभावर चढून तो ध्वज काढला आणि आपल्या सुटकेसमध्ये ठेवला. याच सुटकेसमध्ये तो ध्वज सुमारे ८० वर्षे पडून होता. आपल्या टीममेटचे आणि मित्राचे डेअर हाल प्रिस्टने पूर्ण केले तर होते पण हा ऐतिहासिक ध्वज त्यांच्याकडे जपून ठेवला हे विशेष.
वयाच्या १०३ व्या वर्षी, २००० साली हाल प्रिस्ट यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे होणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांसाठी हा मूळ आणि पहिला ऑलिम्पिक ध्वज इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीला परत दिला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.